Monday, February 14, 2011

पाहणं, दिसणं आणि दर्शन! – A monologue

पाहणं आणि दिसणं यातला शब्दच्छल करण्यात मला काहीही interest नाही. पण दिसणं आणि पाहणं यात फक्त consciousness चा फरक असतो. असा माझा विश्वास आहे. पाहण्यात हा consciousness असतो आणि दिसण्याच्या प्रक्रियेत तो नसतो. दर्शन प्रक्रियेत तर तो आतिशय प्रखरपणे असतो असं मला वाटतं. असो हे मी का लिहितोय. यासाठी हा खटाटोप नाही.

तर ही धडपड आहे याशिवाय इतर काही प्रश्न लिहून काढण्यासाठी...

आकाश, पाणी, हवा या गोष्टी दिसतात का? त्या जशा आहेत तशा पाहता येतात का?

आकाश म्हणजे नेमकं काय? अवकाश जगताना तो मांडायचं कसं? मग ते अवकाश बांधायचं कसं?

पाण्याचा रंग शोधायचा कसा? मग ते पाणी नसलेल्या रंगांनी दाखवायचं कसं?

अंगभर स्पर्शून जाणारी हवा, थंड थंड, बोचणारी, शहारणारी... हे शहारणं, हे बोचणं, हा स्पर्श हवेचा नोंदवायचा कसा आणि कुठे?

….

….

या सगळ्या प्रश्नांसाठी painting च करायला पाहिजे...

- श्री (१४ फेब्रुवारी – २०११ – २२-२५), सिंहगड रोड, पुणे

Thursday, April 8, 2010

मूल्य जाणा...किंमत नको!

कलाक्षेत्राशी संबंधित परखड आणि स्पष्ट मत देणारे, तसंच केवळ चित्रकार म्हणून नाही तर पुढच्या पिढीचे चांगले चित्रकार घडवणारे एक 'जबाबदार शिक्षक' म्हणून प्रभाकर कोलते यांचे महत्त्व जास्त आहे. नुकताच त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'गोदावरी गौरव' सन्मान मिळाला. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
..............

सातवळेकर, सदाशिव साठ्ये, राम सुतार यांसारख्या चित्रशिल्पकारांना गोदावरी पुरस्काराने यापूवीर् गौरवण्यात आलं आहे. तर असा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला त्याबद्दलची प्रतिक्रिया...

* १९७० मध्ये बेंदे, सोलेगांवकर, पळशीकर असे जजेस असताना सुवर्णपदक मिळालं. त्यावेळी जो फुगा गेला होता डोक्यात तोसुद्धा नंतर पळशीकर सरांनी फोडून टाकला. नंतर ललितकलेची अॅवॉर्ड्स कशी विकली जातात, यात कशी लबाडी चालू आहे हे या क्षेत्रात राहून काम करून कळायला लागलं. १९८६ मध्येच ठरवलं की आता कोणत्याही स्पर्धेसाठी चित्रं पाठवायची नाहीत. बक्षिसासाठी काम नाही करायचं. रेकग्निशनची गरज आहे. ते माझ्या आतूनच येतं. मी स्वत:ला ओळखतो, हेच माझं खूप मोठं बक्षीस आहे.

अगदीच जर कामगिरीबद्दल दखल म्हणून कोणी काही गौरव करायचा म्हटला तर मग घ्यायचा की नाही याचा विचार करीन. पण बक्षिसासाठी रांगेत उभं राहणार नाही. जेव्हा गोदावरी गौरवसाठी मला विचारणा झाली तेव्हा माझ्या 'कलेकडून कलेकडे' या पुस्तकाबद्दल माझा हा गौरव करायचा म्हटला असता तर मग मी तो घेतला नसता, पण हा चित्रकला क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल गौरव होता आणि तोही कुसुमाग्रजांच्या नावाचा. तसंच, पद्म पुरस्कारांसारखा हा कोणालाही दिला जातो असं नाही, हाच त्याचा मान आहे. म्हणून मी हा स्वीकारायचा विचार केला. कवितेने चित्रांचा केलेला हा सन्मान आहे. मी केवळ याचा प्रतिनीधी आहे.

चित्र-शिल्पांचा संगीत, नाट्य यासारख्या कलांशी काय संबंध असतो, असं वाटतं?

* एकाच शरीराचे हे सर्व भाग आहेत. ते वेगळे कसे करणार? एकत्र काम करणारी ज्ञानेंदिये आहेत ही. नाक, कान, डोळे, तोंड शरीरापासून वेगळं कसं करता येईल? त्यांची सर्व कामे एकमेकांवर खूप विसंबून आहेत. तशीच ती सतत एकमेकांबरोबरच चालतात. सर्व कलांमधून आत्मसात करता करता हळुहळू चित्रांबद्दलच्या जाणिवा वाढतात. प्रत्येक अवयावाला काही संवेदना उपजत आहेत. त्यांची सांगड तंत्राशी घालायची असते. शिक्षणापासूनच हे रुजणं गरजेचं आहे. कलाशिक्षण हे केवळ तंत्र आहे, मुलांमधल्या संवेदना जागवणारं, त्या सजग ठेवणारं आणि त्या वाढवणारं.

पुण्यात येत्या आठवड्यात होत असलेल्या साहित्य संमेलनात अमिताभ, सचिन हे असणार आहेत. केवळ साहित्यिकच नाहीत तर मराठी साहित्यावर प्रेम करणारेसुद्धा या कार्यक्रमात माननीय आमंत्रित म्हणून राहणार आहेत. याबद्दल आपलं काय मत आहे?

* समकालीन म्हटल्यावर आजूबाजूची सजगता असलीच पाहिजे. त्यामुळे इतर क्षेत्रातल्या कोणात्याही समकालीन माननीय व्यक्तींना बोलवण्याबद्दल काही आक्षेप नाहीत, पण जसं जसं कमशिर्अल होतंय तसं तसं ब्रँड स्टार यायला लागलेत. तुम्हाला सेलिब्रेटीच का हवेत? सचिनच का राहुल दविड का नको? केवळ लोकांना खेचण्यासाठी तुम्ही यांना मॅग्नेट म्हणून वापरणार आहात. हा त्यांचा तर अपमान आहेच, पण इतर कलारसिकांचाही अपमान आहे. सचिनला 'भारतरत्न' द्या असं आपण सांगतो तेव्हा तो आणखी ओशाळत असेल. त्याचं तर म्हणणं आहे की जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल मला फक्त क्रिकेटवर लक्ष द्यायचं आहे. अशा या 'रत्ना'ला लोकं खेचण्यासाठी, चार जाहिराती मिळवण्यासाठी वापरतायत. तुम्ही त्याचा आदर करा, त्याला वापरू नका. ती वस्तू नाही. मुळात हा सगळा मूल्य आणि किंमतीचाच प्रश्न झाला आहे. त्यांच्या काँट्रीब्युशनचं मूल्य जाणा आणि त्यांचा योग्य आदर करा. त्यांची किंमत कसली करता? आणि ती किंमत वापरता आहात.. अमिताभकडून मराठी अभिमान गीत म्हणवून घेण्याऐवजी 'मधुशाला' घ्या म्हणून मराठीत. जो सांस्कृतिक रंग आहे, त्यात राजकीयता आणून आहे तो रंग बिघडवू नका. त्यांनाही कळत असतंच की आपण वापरले जातोय. पण त्यांनाही काही इलाज नसतो. नुसता धंदा कसला करताय?

Thursday, March 4, 2010

चित्रविचारांचा मागोवा.- मनु पारेख

पद्मश्री मनु पारेख यांच्या चित्रांचं प्रदर्शन वरळीच्या ताओ आर्ट गॅलेरीत चालू आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या चित्रांबद्दल व चित्रविचारांबद्दल जाणून घेऊयात...

भारतात ज्या काही थोडक्याच चित्रकारांना 'पद्मश्री'ने सम्मानित करण्यात आलं आहे, त्यात मनु पारेख यांचाही समावेश आहे. (माझ्या माहीतीप्रमाणे असे चित्रकार ४ पेक्षा जास्त नसतील.) मनु पारेख म्हणजे गेल्या पन्नास वर्षांपासून स्वत:ला चित्रात वाहून घेतलेले एक सिनीयर चित्रकार. एका चित्रकाराची अवांतर ओळख यापेक्षा जास्त असू शकत नाही.

असा आकारला चित्रकार
जेजेमधून १९५८ मधून बाहेर पडताना शंकर पळशीकरांसारख्या शिक्षकाचं मार्गदर्शन मिळालं. (आजही ते पळशीकर सरांबद्दल तेवढ्याच आत्मियतेने बोलतात.) काही काळ नाटकांमधून कामं केली. विवर्स सवीर्स असोशिएशनमध्ये डिजाइन कन्सल्टंट म्हणून काम केलं. कलकत्त्याला (आताचं कोलकाता) असताना कन्टेम्पररी चित्रकारांच्या सोसायटीचे सदस्य झाले. भारतातल्या वेगवेगळ्या भागात भेटी देत असतानाच इथल्या मातीतल्या रंगांनी, आकारांनी पारेख यांच्यातला चित्रकार अधिक चांगला घडत गेला. बाहेरगावी प्रवास करताना इथल्या चित्रपरंपरेतला वेगळेपणा आणखी प्रकर्षाने जाणवू लागला.

मनु पारेखीय चित्रं
भारतातल्या मातीत असलेल्या भडक (व्हायब्रंट) रंगाची ओढ त्यांच्या चित्रांमध्ये स्पष्ट दिसते. पारेख यांना चित्र काढताना पॅलेटच वापरावी लागत नाही. चित्रातला आणि चित्राबरोबरचा जो काही संवाद आहे तो कॅनव्हासवरच घडतो. जे आहे ते 'केवळ' जगणं... कुठल्याही पूर्व रुपरेषा ठरवून होईल ते चित्र कसलं?

चित्रकारासाठी चित्र काढणं म्हणजेच 'चित्रसेवा' आहे. नाम घेणं, पुजा करणं यात जी सहजता आहे, आत्मियता आहे, एकाग्रता आहे तीच चित्रनिमिर्तीच्या प्रक्रियेत असते. आणि ही प्रक्रिया सतत कायम चालू असते.

गेल्या तीन-चार वर्षांपासून जाणून बुजून आणलेला त्यांच्या चित्रांमधला बदल आताच्या त्यांच्या सिरीजमध्ये स्पष्ट दिसतो. लँडस्केपच्या आकारांच्या विश्वातून बाहेर येऊन त्यांनी केलेला फुलांचा अभ्यास. फुलांच्या आकारांबरोबरच काही लैंगिक आकारही त्यांच्या चित्रांमध्ये अगदी सहज येतात. मुख्य म्हणजे ते फॉर्मही फुलांच्या फॉर्म एवढेच निरागस असतात... सोफिस्टीकेशनच्या चाकोरीतलं चित्रं उगाच कृत्रिमता आणतं. जे वाटतंय ते स्पष्ट, प्रकट असावं असा प्रयत्न पारेख यांच्या चित्रांमधून नेहमीच दिसत आलाय आणि तो याही चित्रांमधून दिसतोय.

सहजता, रंग, आकार हा पारेख यांच्या चित्राचा श्वासच. त्यांच्या अशा बऱ्याच घडामोडींमधून निर्माण झालेल्या त्यांच्या चित्राचा प्रवास त्यांच्या गप्पांमधून पाहण्याची संधी आपल्याला मिळतेय. ६नोव्हेंबरला त्यांच्यावर केलेली डॉक्युमेंट्री ताओमध्ये दाखवली जाणार आहे.

सतत चेंजसाठी (Change) तयार असलेले पारेख लवकरच पुढच्या काळात काही नवीन कल्पना घेऊन येणार आहेत, याची नोंदही त्यांनी स्वत:ने करून दिली.

पारेख यांचा आताचा 'The Pursuit of Intensity' हा शो आपल्याला पाहायला नक्कीच आवडेल. प्रदर्शन १४ नोव्हेंबरपर्यंत चालू आहे.

ताओ आर्ट गॅलेरी, द व्यु, १६५ अॅनी बेझंट रोड, मुंबई - ४०००१८

(हाजी अलीच्या बसस्टॉपच्या जवळ असलेल्या पेट्रोलपंपाशेजारी)

- श्रीनिवास रणसुभे

'रिप्रेझेंटेशनल'वाद-विवाद

पुण्यामध्ये १० तारखेपासून रवि परांजपेंच्या पंच्याहत्तरीनिमित्त एक चित्रप्रदर्शन व गप्पांचा कार्यक्रम बालगंधर्वमध्ये साजरा होतोय. त्यानिमित्ताने रिप्रेझेंटेशनल व नॉनरिप्रेझेंटेशनल चित्र यावरच्या वादावर टाकलेला हा प्रकाशझोत...


एखाद्या स्पर्शातून, गंधातून, दृष्यातून, आवाजातून एखादा विचार सुचतो आणि तो विचार कलाकार आपल्या कलाकृतीतून मांडतो. हे सुत्र सर्वच कलांमध्ये सारखंच आहे. अगदी पाचही ललितकला या एका धाग्याने घट्ट बांधलेल्या आहेत. मात्र आपले विचार मांडण्याची माध्यमे जेव्हा बदलली तेव्हा त्या सर्वांमध्ये फरक झाला.

चित्रकलेत यातही पुढे रिप्रेझंेटेशनल आणि नॉनरिप्रेझंेटेशनल अशी एक महत्त्वाची जातकुळी निर्माण झाली. हा महत्त्वाचा फरक आला तो दोन्ही प्रकारच्या चित्रांच्या मांडणीतल्या चित्रकांरांच्या अट्टहासामुळे... रिप्रेझंेटेशनल चित्रकारांचा हट्ट असा, की त्यांच्या चित्रातील एलिमंेटस हे दर्शकांना कळतील असेच (प्रतिकात्मक) असतील. त्यामुळे ही चित्रकला फार लोकाभिमुख झाली.(?) तर नॉनरिप्रेझंेटेशनल चित्रपरंपरेतील चित्रकारांनी चित्रातून जास्तीतजास्त 'अंतर्मुख' होण्याचा प्रयत्न कायम ठेवला. (जगणं आणि चित्र काढणं हे वेगळं नसतंच.) पण ज्यांना हे समजलंच नाही, असे पासरीने खोटे अमूर्त चित्रकार निर्माण झाले. तर या दोन्ही दगडांवर पाय ठेऊ पाहणारे, 'मधले' 'माकेर्ट' च्या दृष्टीने चित्र काढणारे चोर चित्रकार निर्माण झाले... सेलिब्रीटीज निर्माण झाले. आता मात्र डेकोरशन आर्ट व केवल-चित्र असं शीतयुद्ध कायम चालूच आहे. हा झाला चित्रकलेतला इतिहास आणि वर्तमान.

ही सर्व पार्श्वभूमी देण्याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये रवि परांजपंेच्या पंच्याहत्तरीनिमित्त आपल्या सर्वांच्या भेटीसाठी एक चित्रप्रदर्शन व गप्पांचा कार्यक्रम बालगंधर्वमध्ये साजरा होतोय. इलस्ट्रेशन व आकीर्टेक्टससाठी लागणारी मांडणीचित्र, अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी 'रवि परांजपे शैली' असा ठसा उमटवला. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ ते चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. 'शिखरे रंग रेषांची' आणि 'ब्रश मायलेज' या पुस्तकांमुळेही ते आपल्याला माहीत आहेत. रवि परांजपे अमृतमहोत्सव समितीद्वारे होणा-या ह्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात रवि परांजपंेशी ड्रॉइंग, इलस्ट्रेशन, सौंदर्यदृष्टी, डिझाइन बेस कल्चर अशा विषयांवर संवाद साधला जाणार आहे. १९९१ मध्ये पुण्यात झालेल्या त्यांच्या व एस एम पंडीत यांच्या प्रदर्शनाने विक्रमी प्रतिसाद मिळवला होता. अगदी लांबच्या लांब रांगा लावून लोकांनी हे प्रदर्शन पाहीलं होतं.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने रवि परांजपंेशी बोलताना, भारतीय परंपरेत अलंकरण हा रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. तो आता खूपच कमी होत चालला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. चित्रनिमिर्तीच्या परंपरेत निरागसतेला खूपच महत्त्व असतं. पण 'रिप्रेझंेटेशनल चित्रनिमितीर्त निरागसतेपेक्षा संस्कार अधिक महत्त्वाचे आहेत. एखाद्या लहान मुलाने काढलेल्या चित्राला संस्काराचं कांेदण असेल तर ते अधिक चांगलं असेल.' असेही परांजपे म्हणाले.

या कार्यक्रमाच्या कॅटलॉगध्ये आपले विचार मांडताना परांजपंेनी नॉनरिप्रेझंेटेशनल चित्रशैलीविरोधात तलवारच उपसली आहे. ते आपल्या लेखात अशा चित्रांना अपरंपरावादी, कुरूप चित्रे म्हणतात. तसंच त्यांच्या या चित्रप्रदर्शनाबद्दल ते म्हणतात की हे प्रदर्शन म्हणजे या काळच्या चित्रांमध्ये ओअॅसिससारखे आहे. याच अमूर्त चित्रांबद्दल विचार मांडताना ते म्हणतात की, 'राग साथीला न घेता ख्याल गायल्यासारखा वाटतो, अशी ही चित्रकला आहे. अर्थात ही अमूर्त चित्रशैली पूर्ण टाकाऊ आहे असं नाही.' असं म्हणताना सॅम फ्रांसीस, रामकुमार यांच्या चित्रांबद्दलचा आदर त्यांनी बोलून दाखवला.

परंपरेतला हा वाद असाच चालू राहील. एका लेखाने, एका प्रदर्शनाने तो मिटणार नाही. किंवा यातून खूप काही लोकशिक्षण होणार नाही. सरते शेवटी एवढंच म्हणावंस वाटतं...

रचना (Design) व कला (Art) यात बराच फरक आहे. नाहीतर हे वेगळे शब्दसुद्धा निर्माण झाले नसते. यातला नेमका अर्थ कळण्यासाठी वेगळं विचारमंथन होण्याची गरज आहे. ज्यांना याचा नेमका फरक कळला ते 'चित्र जगण्याकडे' वळले. बाकीच्यांनी या गतेर्तून बाहेर यावं की येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

।। सत्यचित्रार्पणमस्तु।।

- श्रीनिवास रणसुभे

तरूण चित्रकारांचा 'आकार'

हल्लीच्या चित्रांबद्दल काहीही कळत नाही... खूप काही गूढवाद असलेली चित्रं असतात... नुसताच रंगांचा पसारा असतो... आताच कॉलेज संपलं आणि काहीतरी रंगवून ठेवलंय... असं क्रीटीसिजम चित्रांबाबत व नवीन चित्रकारांबद्दल होत राहतं.

पण कधीकधी खरंच त्या नवीन चित्रकारांची सुरूवातीची भरारी त्यांच्या आकाशाची व्याप्ती दाखवते. असं लिहीण्यामागंचं कारण म्हणजे आताच जहांगिरमध्ये चालू असलेलं काही तरूण चित्रकारांचं चित्रप्रदर्शन...

उमेश पाटील, नागेश घोडके, योगेश पाटील या रहेजा स्कुल ऑफ आर्टमधून मागच्याच वषीर् बाहेर पडलेल्या तरूण चित्रकारांचं 'आकार' हे चित्रप्रदर्शन त्यांना उमगलेल्या अवकाशाची जाणीव करून देते.

उमेश आपल्या चित्राबद्दल म्हणतो की 'आपण आपले भाव प्रकट करण्यासाठी शब्द वापरतो पण आकार व्यक्त करण्यासाठी आपल्याला आकारांचाच आधार घ्यावा लागतो. त्यासाठी अगदी प्रायमरी कलर्स वापरून तो आपलं अवकाश जगतो व तेच तो रंगवतो...'

नागेश मुळचा लातूरचा. 'आपल्या आजूबाजूच्या जगात ज्या गोष्टी रंगामुळे, आकारांमुळे आपलं लक्ष वेधून घेतात त्या आपल्या मनात सबकॉन्शसली घर करून राहतात. त्यांना आपल्या चित्रात सहज येऊ देणं हाच माझ्या चित्राचा उगम.' असं तो म्हणतो.

उमेशच्या चित्रातसुद्धा त्याच्या अक्षरांवरून त्याला चित्र कसं स्फुरलं? ते तो सांगतो. पूवीर् बॅनर बनवताना कळलेली निगेटीव्ह स्पेस तो आता त्याच्या चित्रात जगतो.

या तरूणांना आपलं काम खूप पुढे घेऊन जायचं आहे. जर पुढचा सर्व काळ एक कॅनव्हास म्हटला तर आताशी कुठे त्यांनी फक्त ब्रश टेकवला आहे. त्यांनी त्यांचं काम असंच चालू ठेवावं. या तरूण चित्रकारांचं योग्य ते कौतुक करण्यासाठी आपण हे प्रदर्शन जरूर पाहावं.

प्रदर्शन आपल्याला १४ ते २० सप्टेंबर २००९ या काळात सकाळी ११ ते संध्या ७ या वेळेत पाहता येईल.

स्थळ: जहांगिर आर्ट गॅलेरी, एसी-२, काळा घोडा, मुंबई-२३

- श्रीनिवास रणसुभे

निसर्ग रमलाय चित्रात...

मंगल पाडेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन सोमवार पासून जहांगिर आर्ट गॅलेरी येथे सुरू होत आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या चित्रांबाबत व मिडीअम बाबत काही चर्चा...
..........

ऋतु हिरवा ऋतु बरवा...

पाचूचा वनि रुजवा...

पावसाळा संपताना येणारा हिरवाकंच बहर आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. मग तो चित्रातला विषय असला तर क्या कहने...

याच सुमारास आपल्या सर्वांच्या भेटीला येतंय एक चित्रप्रदर्शन, ज्याचा विषयच मुळात 'ब्लॉसम' आहे. मंगल पाडेकर यांचं चित्रप्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलेरी येथे सुरू होत आहे.

या चित्रप्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे चित्राचं माध्यम... कापडाचं कोलाज. (अर्थात या आधीही या मिडीअममध्ये बरेच प्रयोग झालेत यात वादच नाही.) रंगवलेलं कापड एकमेकांवर चिकटवून, काही ठिकाणी एम्बॉस करून चित्ररचना सुबक केलेली आहे. मात्र कामातील सफाईदारपणा व रंगांचा खेळ तसंच कापडाचा वापरलेला पोत व त्याचा पारदर्शकपणा, हा काही वेळेला हे चित्रं पाहणाऱ्याला नक्कीच गोंधळात पाडू शकतो यात शंका नाही.

चित्रांच्या विषयाबद्दल विचारले असता मंगल पाडेकर म्हणतात...

'आजच्या जगात निसर्गाबद्दलची जवळीक कमी होऊ लागली आहे. पूवीर् बरीच झाडं रस्त्याने जाता-येता दिसायची. आजूबाजूला असायची. पण आजच्या 'फास्ट' जगात आपल्या शेजारच्या दूर्वा (ज्याला आपण फक्त गवत म्हणतो ते) बघायची दृष्टीसुद्धा आपण गमावत चाललो आहे, ती संवेदना संपवत चाललो आहे, त्यांची खंत वाटते.' मंगल पाडेकर मुळच्या मुंबईतल्याच, इथलंच शिक्षण, राहणीमान. पण जो निसर्ग त्यांना घरातल्या कुंडीत दिसला आणि नवऱ्याबरोबरच्या गप्पांमधून जाणवला, जवळ आला त्याच्याशी त्यांची गट्टी जमली आणि त्यांनी ती चित्रांत मांडली.

आपली चित्रं पाहणाऱ्यांना सहज समजावीत. त्यातून त्यांना आनंद मिळावा, हा मुख्य हेतू समोर ठेवूनच आपल्या चित्रांची मांडणी व आकार मंगल पाडेकर ठरवतात. त्यांच्या चित्रातील आकार बरेच रिप्रेंझेंटेशनल असले तरीही काही ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्य घेऊन चित्र अधिक पेंटरली करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

वास्तवात 'पाडेकर' म्हटलं की लगेच काही 'चित्राकार' आपल्या समोर येतात. पण मंगल पाडेकरांनी मात्र आपली छाप नक्कीच काहीशी वेगळी पाडली आहे. त्यासाठी त्यांनी निवडलेलं मिडीअम असो किंवा चित्रातील सहज आकार असोत हे नक्कीच कारणीभूत आहेत.

सर्वच चित्रं ही 'ब्लॉसम' या थिमशी संबंधित असल्याने ती गोंडस, स्वप्नील अशीच आहेत. चित्रातले आकार, रंग हेही तसेच जाणवतील. वास्तवातल्या जगात माणसाला हा गोंडस - गुलाबीपणा थोडा आनंद देतील असा विचार करून चित्रकतीर्ने चित्रांची मांडणी अशी केली आहे. मात्र ही चित्रं केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या निसर्गाच्या मांडणीपर्यंतच येऊन थांबतात असं नक्कीच म्हणावसं वाटतं. असो.

प्रदर्शनात मिडीअमचा वापर पाहून थोडंसं 'बुचक्कळ्यातंच पडायला' आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. हे प्रर्दशन आपल्याला जहांगिरमध्ये १४ ते २० सप्टेंबर या काळात स.११ ते संध्या. ७ या वेळेत पाहता येईल.

जहांगिर आर्ट गॅलेरी, काळा घोडा, फोर्ट

- श्रीनिवास रणसुभे

प्रोडक्ट की शिल्प

आजवरच्या चित्रकलेतल्या वेगवेगळ्या मिडीअम्सवर नजर टाकायची म्हटली तर अगदी दगड, माती, शेण, गवत असे शेकडो मिडीअम्स समोर येतात. तर शिल्पांसाठीसुद्धा अशीच शेकडो माध्यमे वापरली गेली आहेत. ३१ जुलैला संपलेल्या स्वाती साळगांवकर आणि स्मिता खन्ना यांच्या शोमध्ये अशाच एका वेगळ्या प्रकारच्या मिडीअममध्ये काम केलेले दिसले... 'पॉलिएस्टर रेझीन'. त्याच अनुषंगाने घेतलेला हा आढावा.
......

कला निमीर्ती आणि मिडीअम्स
अशी कोणतीही गोष्ट माणसाच्या आजूबाजूला नाही जी कलाकरांनी यापूवीर् कलानिमीर्तीसाठी वापरली नाही. अगदी दगड, माती ते माणसा - प्राण्यांच्या हाडा मांसापासून केसांपर्यत सगळं...

आधूनिक चित्रकलेत पिकासो एक असा चित्रकार आहे ज्याने सुरुवातीला केवळ कॅनव्हास, रंग अशा मिडीअम्सना चिकटून न राहता वेगवेगळ्या माध्यमातून चित्रनिमीर्तीला सुरूवात केली आणि लोकांची तशी दृष्टी बदलवली...

भारतातच कंटेंपररी आर्ट मिडीअम्समध्ये प्लास्टीक, ग्रीस, ग्लिसरीन, फायबर ग्लास, काँक्रीट यासारख्या वस्तुंंची नोंद आढळते. एवढ्यावरच न थांबता कलाकारांनी फोटो, व्हिडीओ, इंटरनेट सारखे डिजीटल मिडीअम्सदेखील वापरलेले दिसतात.

अशाच एका मिडीअमच्या प्रयोगाविषयी आपण जाणून घेऊयात...

प्रदर्शनाविषयी...
'NOTE: nature of the experiment' या शीर्षकाने झालेल्या या प्रदर्शनात स्मिता खन्ना, स्वाती साळगांवकर या 'आकिर्टेक्ट्स'नी केलेल्या काही फनिर्चरवजा 'वस्तू' मांडलेल्या दिसल्या. २७ ते ३१ जुलै या दिवसात काळा घोडा येथील ICIA Institute Of Contemporary Indian Artयेथे झालेल्या या प्रदर्शनाला बऱ्याच मोठमोठ्या हस्तींने भेट देऊन प्रशंसा केली. यात सतीश शहा, हर्ष गोएंका, कालनिर्णयकार जयंत साळगांवकर इ. सारख्यांचा समावेश आहे.

प्रथम या दोन होतकरू आकिर्टेक्टविषयी जाणून घेण्यासारखे विशेष म्हणजे... स्मिताने आकिर्टेक्चरल असोसिएशन-लंडन इथून, तर स्वातीने येल युनिव्हसीर्टी-अमेरिका इथून आपलं शिक्षण हल्लीच पूर्ण केलं आहे.

मिडीअमविषयी...
या प्रदर्शनात या दोघींनी पॉलिएस्टर रेझीन या मिडीअमबरोबर कापड, पाने, बीया अशा काही नैसगिर्क पदार्थांचा वापर केला होता. केवळ माध्यमाचा अभ्यास म्हणून वेगवेगळे प्रयोग करून पाहीले होते. पॉलिएस्टर रेझीन हे मिडीअम इंटेरिअरच्या कामात दरवाजा, कपाट यांच्या सुशोभिकरणासाठी बऱ्याच प्रमाणात वापरले जाते. बफींग केल्यावर ते काचेसारखे पूर्ण पारदर्शक होते. सौंदर्यासोबतच या मिडीअमच्या सर्व शक्यता अतिशय उत्तमपणेे अभ्यासलेल्या दिसल्या.

प्रोडक्ट की शिल्प
संपूर्ण शो हा एखादा फनिर्चर शो वाटला असला, तरी प्रदर्शनातील 'वस्तू' या खूपच कलात्मक होत्या. त्यांना एक कलाकृती म्हणून देखील दर्जा होता. पण स्वाती व स्मिता यांना 'या वस्तू तुम्ही वर्क ऑफ आर्ट म्हणून तयार केल्या आहेत का?' असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्या गोंधळलेल्या दिसल्या... तसा त्यांचा प्रयत्न हा फनिर्चरपर्यंतच असलेला जाणवला. दिवसेंदिवस जसजशी स्मिता व स्वाती यांची प्रगल्भता वाढत जाईल तसा हा गोंधळ कमी होईल आणि कलानिमीर्ती व प्रोडक्ट डिजाइन (art & design) यातील मेख समजून येईल.

त्यामुळे एक फनिर्चर शो एका आर्ट गॅलेरीत चालू आहे असाच एखाद्याचा समज झाला असल्यास त्यात गैर काही नाही.

एखादी कल्पक कलाकृती ही कलाशिक्षण झालेल्या कलाकारानेच निर्माण करावी असा काही नियम नाही. आपल्या घरातील एखादं लहान मुल देखील ते करू शकतं. तसंच डॉक्टर, आकिर्टेक्चर, इंजिनीअरींग असं वेगवेगळं शिक्षण पूर्ण करून कलानिमिर्ती करणारे कलाकार या जगाला माहीत आहेत. अशा कलाकारांच्या कलांनी इतिहासदेखील घडवला आहे.

मुळातच कल्पक असलेल्या कलाकारांना आपल्या भावना प्रगट करण्यासाठी मिडीअमसारख्या 'क्षुल्लक' गोष्टींची कधीच अडसर आलेला नाही आणि येणारही नाही. त्यांच्यातला निसर्ग कल्पकतेने असाच बहरत राहील...

- श्रीनिवास रणसुभे