Thursday, March 4, 2010

निसर्ग रमलाय चित्रात...

मंगल पाडेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन सोमवार पासून जहांगिर आर्ट गॅलेरी येथे सुरू होत आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या चित्रांबाबत व मिडीअम बाबत काही चर्चा...
..........

ऋतु हिरवा ऋतु बरवा...

पाचूचा वनि रुजवा...

पावसाळा संपताना येणारा हिरवाकंच बहर आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. मग तो चित्रातला विषय असला तर क्या कहने...

याच सुमारास आपल्या सर्वांच्या भेटीला येतंय एक चित्रप्रदर्शन, ज्याचा विषयच मुळात 'ब्लॉसम' आहे. मंगल पाडेकर यांचं चित्रप्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलेरी येथे सुरू होत आहे.

या चित्रप्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे चित्राचं माध्यम... कापडाचं कोलाज. (अर्थात या आधीही या मिडीअममध्ये बरेच प्रयोग झालेत यात वादच नाही.) रंगवलेलं कापड एकमेकांवर चिकटवून, काही ठिकाणी एम्बॉस करून चित्ररचना सुबक केलेली आहे. मात्र कामातील सफाईदारपणा व रंगांचा खेळ तसंच कापडाचा वापरलेला पोत व त्याचा पारदर्शकपणा, हा काही वेळेला हे चित्रं पाहणाऱ्याला नक्कीच गोंधळात पाडू शकतो यात शंका नाही.

चित्रांच्या विषयाबद्दल विचारले असता मंगल पाडेकर म्हणतात...

'आजच्या जगात निसर्गाबद्दलची जवळीक कमी होऊ लागली आहे. पूवीर् बरीच झाडं रस्त्याने जाता-येता दिसायची. आजूबाजूला असायची. पण आजच्या 'फास्ट' जगात आपल्या शेजारच्या दूर्वा (ज्याला आपण फक्त गवत म्हणतो ते) बघायची दृष्टीसुद्धा आपण गमावत चाललो आहे, ती संवेदना संपवत चाललो आहे, त्यांची खंत वाटते.' मंगल पाडेकर मुळच्या मुंबईतल्याच, इथलंच शिक्षण, राहणीमान. पण जो निसर्ग त्यांना घरातल्या कुंडीत दिसला आणि नवऱ्याबरोबरच्या गप्पांमधून जाणवला, जवळ आला त्याच्याशी त्यांची गट्टी जमली आणि त्यांनी ती चित्रांत मांडली.

आपली चित्रं पाहणाऱ्यांना सहज समजावीत. त्यातून त्यांना आनंद मिळावा, हा मुख्य हेतू समोर ठेवूनच आपल्या चित्रांची मांडणी व आकार मंगल पाडेकर ठरवतात. त्यांच्या चित्रातील आकार बरेच रिप्रेंझेंटेशनल असले तरीही काही ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्य घेऊन चित्र अधिक पेंटरली करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

वास्तवात 'पाडेकर' म्हटलं की लगेच काही 'चित्राकार' आपल्या समोर येतात. पण मंगल पाडेकरांनी मात्र आपली छाप नक्कीच काहीशी वेगळी पाडली आहे. त्यासाठी त्यांनी निवडलेलं मिडीअम असो किंवा चित्रातील सहज आकार असोत हे नक्कीच कारणीभूत आहेत.

सर्वच चित्रं ही 'ब्लॉसम' या थिमशी संबंधित असल्याने ती गोंडस, स्वप्नील अशीच आहेत. चित्रातले आकार, रंग हेही तसेच जाणवतील. वास्तवातल्या जगात माणसाला हा गोंडस - गुलाबीपणा थोडा आनंद देतील असा विचार करून चित्रकतीर्ने चित्रांची मांडणी अशी केली आहे. मात्र ही चित्रं केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या निसर्गाच्या मांडणीपर्यंतच येऊन थांबतात असं नक्कीच म्हणावसं वाटतं. असो.

प्रदर्शनात मिडीअमचा वापर पाहून थोडंसं 'बुचक्कळ्यातंच पडायला' आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. हे प्रर्दशन आपल्याला जहांगिरमध्ये १४ ते २० सप्टेंबर या काळात स.११ ते संध्या. ७ या वेळेत पाहता येईल.

जहांगिर आर्ट गॅलेरी, काळा घोडा, फोर्ट

- श्रीनिवास रणसुभे

No comments:

Post a Comment