Thursday, March 4, 2010

रानातली फुलं जेव्हा रंगामध्ये हरवतात....

अवतीभवती नाना प्रकारची झाडं, फूलं, वेली, प्राणी, पक्षी आणि खूप काही... अशा निसर्गानं भारलेल्या त्या जंगलात किलबिलणाऱ्या मुलांचा तो आश्रम... 'त्या' दिवशी मात्र त्या आश्रमात जरा जास्तच चिवचिवाट सूरू होता... रानातच वाढलेल्या त्या मुलांना रंगांची नवी दुनिया सापडली होती... काळा, निळा, पिवळा, नारंगी... अशा हाताला येईल त्या रंगात ती रानातली फुलं स्वत:च रेखाटलेल्या नव्या जगात हरवून गेली होती.

मुंबईपासून अगदी काही तासाच्या अंतरावर असलेलं येऊरचं जंगल... त्या जंगलात विवेकानंद अनाथाश्रम गेली कित्येक वर्षे डोईवरचं छप्पर हरवलेल्या त्या मुलांसाठी मायेचं घर बांधून उभं आहे. या आश्रमात चित्रकलेचा वर्कशॉप घ्यायचं असं दहा चित्रकार मित्र ठरवतात आणि हाताशी काहीही नसताना हा वर्कशॉप यशस्वी करुन दाखवतात. त्यांच्या त्या यशानं त्यांना जे समाधान मिळतं त्यापेक्षा खूप काही त्या चिमण्यापाखरांच्या चेहऱ्यावर उमटलेलं असतं.

हे चित्रकार कोणी फारमोठी नाव असलेले चित्रकार नव्हेत. चित्रकलेचे शिक्षण झाल्यानंतर आपापल्या कामामध्ये गुंतलेले तुमच्याआमच्यासारखीच ही माणसं. पण आपली ही चित्रकला फक्त क्लायंटच्या ऑर्डर्स पूर्ण करण्यापलीकडे काहीच साध्य करत नाही याची खंत त्यांना कुठेतरी सतावत होती. मग त्यातील एकाला ठाण्यातील येउरमधील विवेकानंद आश्रमाचा पत्ता सापडतो आणि ठरते, की आपल्या रंगांनी या मुलांच्या चेहऱ्यावर हसू रंगवू.

अनाथाश्रमातील त्या मुलांसाठी वर्कशॉप घ्यायचं ठरतं खरं पण त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचं काय? रंग, कागद अशा साधनांसाठी कॅम्लिनची मदत मिळते आणि मोठ्ठा प्रश्न सुटतो. बाकीच्या खर्चासाठी आपल्याच खिशात हात घालायला हे मित्र तयार होतात. कारण त्या वर्कशॉपमधून त्यांना ना बक्षीस हवं असतं ना मानधन... चित्रकलेचं वेड त्या मुलांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांची ती धडपड होती... आणि त्या ७६ मुलांनी त्या धडपडीचे अक्षरश: सोने केले.

आकाशात ढगांनी आकार करावेत आणि संध्येने त्यामध्ये रंग भरावेत अशा सहजतेने ती मुले चित्रांमध्ये गुतंली होती. कागद, मग तो लहान असो वा मोठा... एखादा मोठा चित्रकार कामामध्ये स्वातंत्र्याबरोबर थोडसं डिसिप्लीन सांभाळतो तसं ती मुलंही सांभाळत होती. त्याची स्टाइलही कोणत्याही बंधनांनी बांधली नसल्याने अगदी नैसगिर्क पद्धतीने कागदावर उमटत होती. त्यातील काही झाडाखाली तर काही अगदी बेंचखाली बसून रंगाचे पोत रेखाटत होती.

त्यांना ना परीक्षा द्यायची होती ना विषय ठरला होता. तुम्हाला जे वाटतं ते काढा हा सल्ला त्यांना व्यक्त होण्यासाठी पुरेसा होता. अशा वेळी बरीच मुलं कार्टून वगैरे काढण्याचा प्रयत्न करतात. पण दोन दिवसांच्या या वर्कशॉपमध्ये या मुलांच्या एकाही चित्रांमध्ये एकही कार्टून नव्हते. होता तो त्यांच्या सभोवती असणाऱ्या निसर्गाचं रंगरुप. त्यात हत्ती होते, पक्षी होते आणि रंगामध्ये दडलेले निसर्गाचे ढंग होते.

या सर्व मुलांपैकी कोणी कधी पुढे मोठा चित्रकार म्हणून जगाला माहित होवो न होवो, पण त्यांच्यातला चित्रकार कायम जिवंत राहील.

-श्रीनिवास रणसुभे

No comments:

Post a Comment