मागच्याच आठवड्यात दिनेश ठक्कर यांच्या वैयक्तिक कलेक्शन मधल्या पोट्रेर्ट्सचं एक चित्रप्रदर्शन म्युझियम आर्ट गॅलेरीत झालं. यात 'प्रदर्शनातली बरीच चित्रं ही खोटी होती' अशी चर्चा झाली, चर्चा आहे आणि ती चालू राहील...
......
मागच्याच आठवड्यात एक चित्रप्रदर्शन म्युझियम आर्ट गॅलेरीत झालं. ते होतं दिनेश ठक्कर यांच्या वैयक्तिक कलेक्शन मधल्या पोट्रेर्ट्सचं. या प्रदर्शनातली बरीच चित्रं ही खोटी होती अशी चर्चा झाली, चर्चा आहे आणि ती चालू राहील...
अशा चित्रांचा फायदा करून घेण्याची पद्धत?
- मोठ्या चित्रकारांची अशी खोटी चित्रं आता काही ४ ते ५ हजारांना करून घ्यायची. (सहीसकटच्या चित्रांच्या किंमती जास्त)
- ती काही वेळा प्रदर्शनात मांडायची.
- त्याच चित्रकाराचं एवढं कलेक्शन असल्याने पुढे Authentication - Certification आपणच करायचं.
- नंतर कालांतराने लिलावात ती काही लाखांना विकून टाकायची.
हे प्रकार अगदी सर्रास होत नसले तरी दिव्याखाली अंधार असतोच...
अशा या 'Fake Art' चे आजपर्यंत बरेच प्रकार घडलेत. त्यातील सर्वांना माहीत असलेले म्हणजे...
o आरांचं पेंटींग तर चांगल्या करकरीत कॅम्लिनच्या कॅनव्हास कॉपी केलेलं होतं (सही सकट). ते नंतर काही तज्ञांच्या आणि अंतिमत: केकू गांधीच्या लक्षात आलं. (तेव्हा केकूंना सर्व नीट लक्षात राहत होतं याची नोंद घ्यावी.) शो नंतर लगेच बंद केला गेला.
o दिल्लीमध्ये रझांचा शो होता. त्यात उद्घाटनाच्या दिवशी रझांचं 'Fake' चित्रं पाहून रझांनाच धक्का बसला होता.
o आता ताओमधल्या शोमध्ये बरवेंचं एक चित्रं खोटं होतं असं म्हणतात. 'ड्रॉईंगमधला फाइननेस बरवेंचा वाटत नाही' अशी प्रतिक्रिया आहे. (खरं खोटं हे करणाऱ्यांना आणि बरवेंनाच माहीत... बरवेंची चित्रं जर अशी कॉपी व्हायला लागली तर करणाऱ्यांचा 'कॅनव्हास कोरा'च म्हणायचा.)
o आताच्या ठक्करांच्या प्रदर्शनात तर सर्रास बऱ्याच कलाकरांची चित्रं कॉपी केली होती असं म्हटलं गेलं. त्यात त्रिंदाद, एम. आर. आचरेकर, व्ही. ए. माळी, धुरंधर, इ. इ. (कदाचित सगळी नसतीलही. पण एक दिसल्यावर इतर चित्रांची शंका नक्कीच घेतली जाते.)
कशावरून...???
आपल्याला सगळ्यांना व्ही. ए. माळी हे मोर आणि मुलगी या चित्रासाठीच नाहीत तर त्यांच्या बऱ्याच स्टीललाईफसाठीदेखील माहीत आहेत. केवळ चित्रकार म्हणूनच नव्हे तर कलेमध्ये वेगवेगळ्या वाटेवर ते कित्येकांना प्रेरणाही ठरलेत. चित्रकाराचं ऑईल कलरमधल्या ब्रशवरून पेस्टलमध्ये काम कसं होत असेल याचा अंदाज करणं जाणकारांना कठीण नाही. एम. आर. आचरेकर त्यांच्या वेळचे एक महत्त्वाचे पोर्ट्रेट पेंटर. १९३५ मध्ये तर त्यावेळचे व्हॉइसरॉय विलिंग्टन यांनी त्यांना लंडनला पाठवलं होतं, पाचव्या किंग जॉर्जच्या सिल्वर ज्युबिली कार्यक्रमासाठी. (या विस्मृती जागवणं गरजेचं वाटतंय...) तर (वयाच्या तिसाव्या वषीर्) १९३७ सालचं त्याचंच चित्रं हे एका नवशिक्या मुलासारखं कसं असू शकतं? त्यांच्या कलाशिक्षणाच्या काळात त्यांनी कितीतरी चुका केल्या असतीलही. पण चुकलेल्या कामांचापण एक दर्जा असतो.
या खोट्या चित्रनिमिर्तीबद्दलच्या काही प्रतिक्रिया...
'ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचं अक्षर, त्याचप्रमाणे चित्रकाराचं ड्रॉइंग हे त्याचं व्यक्तिमत्त्व असतं. एवढ्या मोठ्या चित्रकारांची एवढी poor drwaings असूच शकत नाहीत. ही चित्रं या कलाकारांची असूच शकत नाहीत.'
- दत्तात्रय पाडेकर
'मी दिनेशभाईंना व्यवस्थित ओळखतो. मधल्या काळात भूरट्या चित्रकारांनी अशी चित्रं काढून मोठ्या किंमती मिळवल्यात. पण शो न पाहील्यामुळे मी आताच्या चित्रांबद्दल काहीच बोलू शकत नाही.'
- काशीनाथ साळवे
'असे पुरावे मिळणं एकतर कठीण असतं आणि पुरावे असले तरी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे अॅक्शन तरी कशी घेणार.'
- सतीश नाईक
'आम्ही चित्रकारांकडून एकावेळेला एकदम ३०-४० चित्रं विकत घेतो. त्यात वाईट, चांगली, बरी अशी सगळीच चित्रं असतात. शेवटी वाईट असली तरी ती चित्रंच आहेत ना... त्यामुळे आम्हालासुद्धा बरीच चित्रं मिळतात आणि परवडतातसुद्धा. '
- दिनेश ठक्कर
ज्यांना चित्रातलं खरं खोटं कळतं त्यांना कोणतीही अॅक्शन घ्यायची नाहीय. आणि जे काहीतरी करू शकतात, त्यांना यातलं काही कळत नाही, किंवा तशी कोणतीही निदोर्ष यंत्रणा नाही. त्यामुळे जर असं काही झालं असेल तर आपल्याला इथे त्याबद्दल फक्त त्रिवार 'निषेध' नोंदवता येईल. 'निषेध... निषेध... निषेध...' नाहीतर आपण असं म्हणू शकतो की ओल्याबरोबर सुकंही (पाहायला) मिळतं...
- श्रीनिवास रणसुभे
No comments:
Post a Comment