या आठवड्यात पाहण्यासाठी दोन महत्त्वाची प्रदर्शनं म्हणजे जेजे स्कुल ऑफ आर्ट येथे लागलेलं ४९वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (प्रोफेशनल कॅटेगरी) आणि दुसरं नेहरू सेंटर मधला ग्रुप शो.
जेजे मधलं प्रदर्शन एकतर चुकून इथे लावलं गेलंय किंवा सरकारचं पुन्हा एकदा या राज्य प्रदर्शनाकडे (अंतिमत: कलेकडे) वाढत चाललेलं दुर्लक्ष दर्शवतंय. याबद्दल कितीही ओरड उठवून काहीही उपाय मात्र नाहीत. दरवषीर् जहांगिरसारख्या गॅलेरीत लागणारं प्रदर्शन कदाचित कॉस्ट कटींग म्हणून (गॅलेरीची तारीख रद्द करून) जेजेमध्ये लावलंय (अर्थातच चकटफू). आणि आपलं कलासंचानालय ते करून घेतंय. अशी गत आहे. असो. ते प्रदर्शन होतंय ते काही कमी नाही. शेवटी भावी 'मोठ्या' चित्रकारांना चित्र दाखवायला जागा मिळतेय ना... हे प्रदर्शन आपल्याला २९तारखेपर्यंत पाहता येईल.
तर दुसरीकडे अशा कुठल्याही सरकारी सपोर्टशिवाय काही तरूण चित्रकार आपलं काम नेहरू सेंटरमध्ये दाखवतायत. या चित्रांच्या विक्रीतून येणारा पैसा हे चित्रकार २६/११ ची झळ पोहोचलेल्या कुटुंबांना मदत म्हणून देणार आहेत. 'चित्र, इन्वेस्टमेंटचं एक माध्यम, एक घर सजवण्याची वस्तू असते. तसं ते व्यक्त होण्याचं ... तर कधी दु:खितांचे अश्रू पुसण्याचं माध्यम देखील असतं.' अशा निर्मळ भावनेने केलेला हा प्रयत्न नक्कीच दखल घेण्याजोगा आहे. मदत करता येवो ना येवो पण ही शाबासकीसाठी पाठ थोपटायला तरी हे प्रदर्शन नक्कीच पाहीलं गेलं पाहीजे. हे प्रदर्शन आपल्याला ३० तारखेपर्यंत नेहरू सेंटर आर्ट गॅलेरी (डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी) येथे पाहता येईल.
- श्रीनिवास रणसुभे
No comments:
Post a Comment