Thursday, March 4, 2010

चित्रामध्ये चित्राबाहेर - वीर मुंशी

चित्रकारासाठी त्याची 'प्रेरणा' हीच त्याच्या चित्रनिमिर्तीतील महत्त्वाचं कारण असते. ती प्रेरणाच कोणतं माध्यम निवडावं, ते कसं वापरावं यासाठी प्रवृत्त करते. मग त्यानुसार चित्रकार रंग, ब्रश, पेपर, माती, मेटल, पाणी, झाड, पान, एवढंच नाही तर कॅमेरासुद्धा.... यापैकी कोणतं साधन निवडावं हे ठरवतो आणि त्याच्या प्रतिभेनुसार त्याची मांडणी करतो.

वीर मुंशी सगळ्या कला जगतात दिल्लीतले एक काश्मिरी चित्रकार म्हणून माहीत आहेत. तसेच त्यांचे चित्रातले मानवी आकार, एक्सप्रेशन, मल्टीमिडिया इन्स्टॉलेशन, संकल्पना यांमुळे देखील माहीत आहेत. किंबहूना जगभर हीच त्यांची ओळख आहे. मात्र जेव्हा त्यांची प्रेरणा त्यांना कॅमेरा वापरायला प्रवृत्त करते तेव्हा निर्माण होतं 'शार्पनेल' हे चित्रप्रदर्शन.

या प्रदर्शनाचा एक भाग म्हणजे... काश्मीरी पंडीतांच्या घरांचे असे काही फोटो ज्या 'वास्तू' म्हणून त्यांच्या अनुभवात खोल कुठेतरी अजूनही घर करून आहेत. क्लीक करताना कधी तुटून फडकत असलेली खिडकी त्यांना खुणावते तर कधी कागदासारखा चुरगळलेला घराचा पत्रा. कधी फाटक्या भिंतीतून दिसणारं आकाश प्रेरणा ठरतं तर कधी संपूर्ण तीन मजल्याच्या दगडी भितीचं घर.

आणि प्रदर्शनाचा दुसरा भाग म्हणजे 'द चेंबर' हे इन्स्टॉलेशन, जागतिक पातळीवर चाललेल्या दहशतीबद्दल वीर यांच्या अनुभूतीचं दर्शन. यांत चित्र केवळ पाहणं होत नाही, तर आपण त्या चेंबरमध्ये (चित्रामध्ये) त्या चित्राचा एक भाग होतो आणि त्याचा अनुभव घेतो.

हा अनुभव फक्त पेपरवर पाहण्यापेक्षा गॅलेरीत जाऊन घ्यावा असा आहे. तो आपल्याला ०४ एप्रिलपर्यंत ताओ आर्ट गॅलेरीत घेता येईल.

ताओ आर्ट गॅलेरी
द वीव्ह, १६५, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी. नेहरू तारांगण जवळ.

- श्रीनिवास रणसुभे

No comments:

Post a Comment